मंगलवार, 4 मार्च 2025

खंडणीच्या आड येवू नको, वाल्मिक अण्णा तुला जिवे सोडणार नाही'; दोषारोपपत्रात काय माहिती आली समोर



Source : BBC News Marathi 

"जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू. असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल. कामाला लागा. विष्णू चाटेशी बोलुन घ्या तो तुम्हाला मदत करेल." हे शब्द आहेत वाल्मिक कराड याचे.

8 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात झालेला हा संवाद. यानंतर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून अतिशय निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली.

या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराडचा उल्लेख करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या दोषारोपपत्रात नमूद करण्यात आलंय.

या हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोषारोपत्र बीड जिल्हा विशेष न्यायालयात सादर केले आहे. याप्रकरणी 12 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? दाखल करण्यात आलेल्या दोषारोपत्रात आणकी काय माहिती समोर आली, ते जाणून घेऊया.

चार्जशिटमध्ये आणखी काय माहिती आहे?

संतोष देशमुख हत्याप्रकरणात कधी काय घडलं याची सविस्तर माहिती दोषारोपपत्रात देण्यात आली आहे.

त्यानुसार, 8 ऑक्टोबर 2024 रोजी अवादा एनर्जी प्रा. लि. च्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराडची धमकी मिळाली. पण, वारंवार खंडणी मागितल्यानंतरही खंडणी न मिळाल्यानं सुदर्शन घुले, प्रतिक घुले व सुधीर सांगळे हे कंपनीमध्ये गेले व तेथील सुरक्षा रक्षकास मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली.

याबाबत कर्मचाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना माहिती दिली. देशमुखांनी सदर स्थळी जाऊन सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांना, 'कंपनी बंद करु नका. लोकांना रोजगार मिळू द्या, अशी विनंती केली.


मात्र, सुदर्शन घुले याने संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणत 'सरपंच तुला बघून घेवू, तुला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी दिली.

यानंतर विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुखांना कॉल करुन खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिक अण्णा तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत होता.

संतोष देशमुख यांनी पत्नी अश्विनी देशमुख, मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना याबाबत माहिती दिली होती.

असा रचला हत्येचा कट

दिनांक 8 ते 9 ऑक्टोबर दरम्यान वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी रचलेल्या कटानुसार, अवादा कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी वसूल करायचे ठरवले.

जर खंडणी देण्यास नकार दिला तर कंपनीचे कामकाज बंद करायचे व जोपर्यंत कंपनी खंडणी देत नाही तोपर्यंत कंपनी चालू करु द्यायची नाही. कंपनी बंद करण्यास जो कुणी अडथळा निर्माण करेल, त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा. जेणेकरुन, कंपनी घाबरुन आपल्याला खंडणी देईल तसेच परिसरात आपल्या टोळीची दहशत निर्माण होईल, असा कट रचण्यात आला होता.

या कटानुसार, 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे, सुदर्शन घुले व गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे भेटले.

त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला की, "संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचा काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या. "


त्यानंतर 9 डिसेंबर रोजी रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.

कशाने केली मारहाण?

अपहरण करतांना आरोपींनी पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीकचा पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर व काठीचा वापर केला. या घटनेचे मन सुन्न करणारे फोटो समोर आले असून यात आरोपी संतोष देशमुख यांना अतिशय अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहेत.

क्रौर्याची परिसीमा म्हणजे, देशमुख गतप्राण झाल्यानंतरही आरोपी अमानवीयपणे मृतदेहावरील कपडे काढून मारहाण करताना मोठमोठ्याने हसत घटनेचा आनंद साजरा करीत असल्याबाबत स्पष्ट दिसून येत आहे.

फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत असून हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला.

अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते.

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

लोकप्रिय पोस्ट

Popular

Recent

Privacy Policy

Terms & Conditions

Comments

यह ब्लॉग खोजें

@2025 Daily News Vala. Blogger द्वारा संचालित.