आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी WHO ने दररोजच्या आहारातून मिठाचे प्रमाण 5 ग्रॅमपेक्षा कमी आणि सोडियमचे प्रमाण 2 ग्रॅमपेक्षा कमी ठेवण्याची शिफारस केली आहे. WHO च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे 80 लाख लोक अयोग्य आहारामुळे मृत्युमुखी पडतात, त्यातील 19 लाख मृत्यू हे जास्त प्रमाणात सोडियमच्या सेवनाशी संबंधित असतात.
2019 च्या आकडेवारीनुसार, जगभरातील लोक सरासरी रोज 4.3 ग्रॅम सोडियमचे सेवन करतात, जे WHO ने ठरवलेल्या मर्यादेच्या दुप्पट आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे WHO ने नमूद केले आहे.
WHO ने केलेली पाहणी
या मुद्द्यावर जगभरात 26 वेगवेगळ्या चाचण्या (ट्रायल्स) घेण्यात आल्या, ज्यामध्ये भारताचाही समावेश होता. या चाचण्यांमध्ये एकूण 35,000 लोक सहभागी झाले होते. दोन महिने ते पाच वर्षांपर्यंत या लोकांच्या आहारावर संशोधन करण्यात आले.
या अभ्यासात, नेहमीच्या टेबल सॉल्टऐवजी कमी सोडियम असलेल्या मिठाचा आहारात समावेश करण्यात आला आणि त्याचा आरोग्यावर होणारा प्रभाव तपासण्यात आला.