Bhadipa Show: रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. इंडियाज गॉट लेटेन्ट या शोमध्ये त्याने केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले. त्यानंतर भाडिपाच्या 'अतिशय निर्ल्लज कांदेपोहे' या एपिसोडचे प्रसारण पुढे ढकलण्यात आले आहे. या एपिसोडमध्ये भाग्यश्री लिमयेसोबत भाग घेतला होता, पण आता सई ताम्हणकरसोबत होणारा भाग भाडिपा पुढे ढकलणार आहे. याशिवाय, या शोसाठी ज्यांनी तिकिटं बुक केली होती, त्यांना पैसे परत दिले जाणार आहेत. दरम्यान भाडिपा आणि सारंग साठ्ये मनसेच्या रडारवरती आले आहेत, या सर्व वादादरम्यान आणि शो रद्द केल्यानंतर सारंगने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला सारंग साठ्ये?
सध्या यावर आम्हाला काही बोलायचं नाही आहे. आम्हालाच माहिती नाही हे कशामुळे सुरु झाले आहे. आम्ही सर्व गोष्टी समजून घेत आहोत. त्यामुळे आता बोलणे म्हणजे आगीत तेल टाकण्यासारखं आहे, सध्या उद्याचाच शो रद्द करण्याचे ठरवलं आहे, अशी प्रतिक्रिया सारंग साठ्येने दिली आहे.
भाडिपाने नेमकं काय म्हटलं आहे?
रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर भाडिपाने त्यांचा उद्या (14 फेब्रुवारीला) होणारा शो रद्द केला आहे. त्याबाबतची सोशल मिडिया पोस्ट देखील त्यांनी शेअर केली होती. पोस्टमध्ये, "भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटतं आहे की, सध्या वातावरण तापल्यामुळे 14 फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्ल्लज कांदे पोहेचा शो आम्ही Postpone करत आहोत. तसंही Valentines Day ला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या Fans वर प्रेम आहे. आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. तिकिटांचा Refund 15 Working Days मध्ये तुमच्या Account वर जमा होईल. Refund ने स्वतःसाठी काहीतरी छान Gift घ्या. आम्हाला माहीत आहे की आमच्या Fans चंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या Style ची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा Exclusive Content बघण्यासाठी खास YouTube Membership सुरु केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचे सर्व Videos 18+ वयासाठी Restrict केले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता. अतिशय निर्लज्जपणे हा आमचा सभ्य Show लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला… पण तुमचा यंदाचाही Valentines Day घरीच बसून जाणार", असं लिहलं आहे.
मनसेचा खळ्ळखट्याकचा इशारा!
रणवीर अलाहाबादीयाच्या प्रकारानंतर सर्वत्र वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. आता सारंग साठ्येच्या अतिशय निर्लज्ज शो मनसेकडून बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मनसे चित्रपट सेनेच्या निशाण्यावर सारंग साठ्येचा अतिशय निर्लज्ज शो आला आहे. सारंग साठ्ये विरोधात मनसे चित्रपट सेना आक्रमक झाली आहे. मनसे स्टाईल पुण्यातील शो बंद पडणार असल्याचा मनसे चित्रपट सेनेचे पुणे अध्यक्ष चेतन धोत्रेनी सोशल मिडियावरती पोस्ट लिहून इशारा दिला आहे. त्याचबरोबर आपल्या फेसबुक पोस्टमधून मनसे चित्रपट सेनेने सारंग साठ्येला विरोध दर्शवला आहे.