पुण्यासह राज्यातील विविध भागांत सध्या गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) चा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस या आजाराने बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, सध्या राज्यातील GBS रुग्णसंख्या 127 वर पोहोचली आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 56 वर्षीय महिलेचा ‘जीबीएस’मुळे मृत्यू झाला आहे. हा या आजारामुळे राज्यातील दुसरा मृत्यू आहे. संबंधित रुग्ण सिंहगड रस्त्यावरील नांदोशी येथील रहिवासी होत्या.
15 जानेवारीला त्यांना अशक्तपणा आणि अर्धांगवायूची लक्षणे जाणवू लागल्याने प्रथम नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक बिघडल्याने 17 जानेवारीला त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच 28 जानेवारीला श्वसनक्रिया बंद पडल्याने आणि अर्धांगवायूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.